रिझर्व्ह बँकेने सुरु केलेलं ‘हर पेमेंट डिजिटल’ अभियान नेमके काय आहे ?

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कालपासून ‘डिजिटल पेमेंट जागृती आठवडा 2023’ या निमित्तानं ‘प्रत्येक पेमेंट डिजिटल’ या अभियानाची सुरुवात केली. भारतातील (Inida) प्रत्येक व्यक्तीला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवण्याच्या अनुषंगानं हे अभियान राबविण्यात येत आहे. 12 मार्चपर्यंत हे अभियान सुरु राहणार असून ‘डिजिटल पेमेंट अवलंब करा आणि इतरांनाही शिकवा’ हा या अभियानाचा विषय आहे.

डिजिटल पेमेंटची सुलभता आणि सुविधा अधिक मजबूत करणं आणि नवीन ग्राहकांना त्याची सुलभता पटवून आणि त्याच्या वापराकडे त्यांना वळवणं असं या ‘प्रत्येक पेमेंट डिजिटल’ चं उद्दिष्ट असल्याचं गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी म्हटलं आहे. उपलब्ध डिजिटल पेमेंट (Digital Payments) माध्यमांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध मोहिमा बँका आणि बँकेतर पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून आखल्या जात आहेत. यामुळे देशात डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहन आणि समर्थन मिळेल, असं सांगत डिसेंबर 2022 पासून भारतातील या स्वरूपाच्या पेमेंट प्रणालीद्वारे दरमहा एक हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचंही दास यांनी म्हटलं आहे.