जितेंद्र आव्हाडांनी उचललं टोकाचं पाऊल; आमदारकीचा राजीनामा जयंत पाटलांकडे सोपविला

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद नामक महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. यानंतर पोलिसांनी आव्हाडांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गेल्या ७२ तासात पोलिसांनी आव्हाडांविरुद्ध नोंदवलेला हा दुसरा गुन्हा आहे. या जाचानंतर आव्हाड यांनी ट्वीटद्वारे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आव्हाड यांना राजीनामा देण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न केले, परंतु पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर त्यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे राजीनामा (Jitendra Awhad Resignation) दिला आहे. स्वत: जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

आव्हाड यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर जयंत पाटील आणि आव्हाड यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

“आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना बराच वेळ समजावलं. पण असे खोटे गुन्हे दाखल होणं त्यांच्या मनाला लागलंय. जो गुन्हा कधी केलाच नाही, त्यासंदर्भात गुन्हा दाखल होत असेल तर योग्य नाही. या घटनेचा व्हीडिओ सर्वत्र उपलब्ध आहे. त्यात स्पष्टपणे सगळं दिसतंय. यात कुठेही काही चुकीचं दिसत नाही. तरीही असा गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला. याबाबत मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.