ठाकरे-गडकरी भेटीत नेमकी काय चर्चा झाली? गडकरींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले….

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्यभरात रंगलेली असताना किल एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नितीन गडकरी दाखल झाले. यानंतर ११ वाजून ५० मिनीटांच्या सुमारास ते राज ठाकरेंची भेट घेऊन बाहेर पडले.

या भेटीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं. म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो. परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती.

त्यांचे माझे संबंध गेल्या तीस वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कुठलांही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिली आहे. नितीन गडकरी जरी ही भेट राजकीय नसल्याचे सांगत असले तरी या भेटीचं टायमिंग आणि राज ठाकरेंनी शिवतीर्थावर घेतलेली भूमिका पाहता, अनेकांना ही मनसे-भाजपच्या युतीची सुरूवात वाटू लागली आहे.