पाकिस्तानच्या इतिहासात कधीही जे झालं नाही ते इम्रान खान यांच्यासोबत झालंय

कराची – पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीत आज नवीन पंतप्रधानांची निवड होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ (Shahbaaz Sharif) यांनी या पदासाठी नामांकनपत्र दाखल केलं आहे. तेहरीके इन्साफ पक्षाचे सदस्य असलेले मावळते परराष्ट्रमंत्री शाह महसूद कुरेशी (Shah Mahsud Qureshi) यांनीही नामांकनपत्र दाखल केलं आहे.

नॅशनल असेंब्लीमध्ये काल मावळते पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) अविश्वास ठरावात पराभूत झाल्यानंतर नवीन पंतप्रधान निवडण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. अविश्वास ठरावात पराभूत झाल्यामुळं पंतप्रधानपद गमवावे लागलेले इम्रान खान हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. 342 सदस्य असलेल्या असेंब्लीत विरोधी पक्षांना 174 मतं मिळाली. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 172 मतांची आवश्यकता होती.

पाकिस्तान यापूर्वी 1947 मध्ये स्वतंत्र झाला असला, तरी परकीय कटाविरुद्ध पुन्हा एकदा स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं आहे, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी काल व्यक्त केली होती. परकीय शक्तींनी आपलं सरकार पाडण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, इम्रान खान आज दुपारी तेहरीके इन्साफ संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत उपस्थित राहणार आहेत. बैठकीचं आधीचं ठिकाण बदलून ती आता नॅशनल असेंब्लीच्या इमारतीत घेण्यात येणार आहे.