‘जातीयवादी किरण मानेला सपोर्ट करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काय दाखवू पाहतेय ?’

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांचे समर्थक हे या निमित्ताने भाजपवर टीका करत आहेत. मात्र आता भाजपच्या नेत्यांनी देखील या टीकेला सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांचा चांगलाच समाचार वाघमारे यांनी घेतला आहे.

विकास वाघमारे यांची फेसबुक पोस्ट

एक नाट्य क्षेत्रात काम करणारा होतकरू नट होता म्हणे, त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही, आणि तो काही आघाडीचा अभिनेताही नव्हता की ज्याला सगळं राज्य ओळखेल असं! पण नाट्य क्षेत्रात काम करणारा अन अंगात राजकीय खुमखुमी असणारा किरण माने नावाच्या माणसाला स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या एका मालिकेतून हाकलून दिले. त्याचा कोणता रोल होता, त्याने कोणत्या कोणत्या सिनेमात काम केलेय वगैरे मला पुसटशीही कल्पना नाही.

आता त्याला त्या मालिकेतून हाकलून दिल्यावर अवघी राष्ट्रवादी जोर धरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलायला लागली, त्यात बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाडही मागे नव्हते हे विशेष! पण किरण मानेना का हाकलून दिलं, याबाबत खरी माहिती आता पुढे येतेय की त्याचा त्या मालिकेच्या सेटवरचा वावर आणि काही गोष्टी निर्मात्याला खटकल्या आणि म्हणून त्याला हाकलून दिले आहे, तो व्यावसायिक विषय आहे असं समजत आहे.

इकडे मात्र किरण माने भाजपा मला ट्रोल करत आहे, मला धमक्या देत आहेत, शिव्या देत आहेत असं म्हणत आहेत. मात्र किरण मानेंची सोशल मीडियावरची नेत्यांना बोलण्याची भाषा पाहिली तर कोणत्याही सुसंस्कृत माणसाच्या डोक्यात तिडीक जाईल अशीच भाषा आहे, देशाच्या पंतप्रधानांना एकेरी बोलणं, भाजपा नेत्यांवर एकेरी आणि अर्वाच्य भाषेत टीका करणं, शिव्या देणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्वाच्य भाषेत टीका करणं, विशिष्ठ समाजावर टीका करून जातीयवाद निर्माण करणं आणि हे सर्व करत असताना त्यावर भाजपाचे कार्यकर्ते विरोध करायला लागले तर कलाकार म्हणून विरोध करताहेत असं म्हणत पडद्यामागे लपणारा हा टिनपाट जातीयवादी होतकरू नट आहे.

अशा जातीयवादी माणसाला राष्ट्रवादीने सपोर्ट करणं काही नवीन नाही, मनसेचे नेते राज ठाकरे मागेच म्हणाले आहेत, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला. आता या जातीयवादी मानेला सपोर्ट करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काय दाखवू पाहतेय हे राज्याला दिसतंय!