सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

NCP   : लोकसभेत सरकारच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर आज चर्चा सुरु राहणार आहे. काल ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत अविश्वासाच्या ठरावाला उत्तर देणार आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे दोन गट या अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून आमने-सामने आले आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप  निघाले आहेत.

एकीकडे अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे (Sharad Pawar Camp) मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.