पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर कोण आहेत?

पाकिस्तानच्या लष्कराच्या मर्जीतले समजले जाणारे खासदार अन्वर उल हक काकर (Anwar ul Haq Kakar) तिथले हंगामी पंतप्रधान बनले आहेत. माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्यातल्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर बलोचिस्तानचे खासदार काकर यांची हंगामी पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली.

या निवडीतून पाकिस्तानच्या लष्करानं देशाच्या प्रमुख पदावर आपल्या मर्जीतल्या व्यक्तीची नियुक्ती करुन देशाच्या सत्ताकारणावरची आपली पकड मजबूत केल्याचं मानलं जात आहे. तसंच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरचं कायदेशीर आणि राजकीय संकट इतक्यात संपण्याची चिन्हं नाहीत हेही स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार या हंगामी सरकारला 90 दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागतील.

अन्वर-उल-हक काकर यांची गणना देशातील प्रसिद्ध नेत्यांमध्ये केली जात नाही, पण ते ज्या क्षेत्रातून येतात ते महत्त्वाचे आहे. वास्तविक त्यांचा बलुचिस्तान प्रांत अतिरेकीपणामुळे खूप चर्चेत राहतो. अन्वर-उल-हक 2018 मध्ये बलुचिस्तानमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी पाकिस्तान सिनेटमध्ये बलुचिस्तान अवामी पक्षाचे संसदीय नेते म्हणून काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काकरचे पाकिस्तानी लष्करासोबतचे संबंध खूप चांगले आहेत. त्यामुळे कुठेतरी अन्वर यांना कार्यवाहक पंतप्रधान बनवण्यात आल्याचे मानले जात आहे.

याआधी अन्वर-उल-हक हे परदेशी पाकिस्तानी आणि मानव संसाधन विकासावरील सिनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यासोबतच ते व्यवसाय सल्लागार समिती, वित्त आणि महसूल, परराष्ट्र व्यवहार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सदस्यही राहिले आहेत. अन्वर-उल-हक यांनी बलुचिस्तान विद्यापीठातून राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.