‘भाजपच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे, कोण भ्रष्टाचारी आहे? हे जनतेलाही माहित आहे’

 मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी या नेत्यांच्या विरोधात जोरदार आवाज बुलंद केला असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,  दररोज उठून भ्रष्टाचाराचे आरोप करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. दररोजच्या या नौटंकीला जनता कंटाळली आहे. कोण भ्रष्टाचारी आहे? हे जनतेलाही माहित आहे.

याच किरिट सोमय्या यांनी नारायण राणे, कृपाशंकरसिंह यांच्यावरही याच पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.  ह्या दोघांनी भाजपात प्रवेश केल्यांतर ते गंगास्नान करुन पवित्र झाले का? असा उलटा सवाल केला. केंद्रातील मोदी सरकारचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराच्या नावाने वातावरण निर्मिती करण्याचे काम भाजपा करत आहे. हे सर्व थांबवा व महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण मिळून काम करु असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

दरम्यान, केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती देखील पटोले यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख, भाईजान उपस्थित होते.