हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नवे सीईओ रोहित जावा कोण आहेत? जाणून घ्या त्यांची संपत्ती

देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने आपल्या उच्च व्यवस्थापनात बदल करण्याची घोषणा केली आहे. रोहित जावा यांची हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

रोहित जावा सध्या युनिलिव्हरमध्ये ‘चीफ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ आहेत. त्यांची या पदावर 27 जून 2023 पासून पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. एचयूएलने याबाबतची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. रोहित जावा सध्या हिंदुस्तान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असलेले संजीव मेहता यांची जागा घेतील. 10 मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, रोहित जावा 1988 मध्ये HUL मध्ये सामील झाले होते. त्यांनी एचयूएलमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवात केली. 56 वर्षीय रोहित जावा सध्या लंडनमध्ये असतात आणि युनिलिव्हरमध्ये ट्रान्सफॉर्मेशनचे प्रमुख आहेत. युनिलिव्हर चीनचे उत्तर आशियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चीनमध्ये युनिलिव्हरचा व्यवसाय वाढविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. संजीव मेहता यांना ऑक्टोबर 2013 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनवण्यात आले होते.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले
रोहित जावाने सेंट स्टीफन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या एफएमएसमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमातही भाग घेतला आहे. रोहित जावाने त्याच्या विपणन कारकिर्दीत आशियाई क्षेत्रातील उद्योगात चांगले योगदान दिले आहे. इंटरनॅशनलिस्ट मॅगझिनने 2013 मध्ये त्यांना ‘द एशिया 50’ मार्केटर्सपैकी एक म्हणून ओळखले. त्यांना 2015 चा ‘सीईओ एक्सेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नेट वर्थ किती आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित जावाला खूप चांगला पगार मिळतो. पगाराव्यतिरिक्त रोहितला कंपनीकडून इतरही अनेक सुविधा मिळतात. मात्र, रोहितच्या एकूण संपत्तीबाबत कुठेही माहिती उपलब्ध नाही.