रशियाला दोषी ठरवणारा ठराव मंजूर; भारताने घेतली ‘ही’ भूमिका

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून अवघ्या जगासाठी हे युद्ध डोकेदुखीचा विषय बनला आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला करून एक महिना उलटला आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला होता. अजूनही हे युद्ध सुरूच असून रशिया माघार घ्यायला तयार नाही.

एकीकडे रशिया आपला आक्रमक हेका सोडायला तयार नसताना दुसरीकडे युक्रेनच्या बाजूने देखील आता आंतरराष्ट्रीय पाठिंबा तयार होऊ लागला आहे. यातच काल युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव संयुक्त राष्ट्रांनी काल मंजूर केला आणि तात्काळ युद्धविराम करण्याचंही आवाहन केलं.

140 देशांनी या ठरावाच्या बाजूनं आणि 5 देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर 38 देश मतदानापासून अलिप्त राहिले. उभय देशांमधील शत्रुत्व संपविण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असून तातडीची मानवतावादी मदत गरजेची आहे, असं सांगून भारतानं या ठरावावर मतदान करणं टाळलं.