नरेंद्र मोदी-शरद पवार भेटले की ‘ती’ गोष्ट हमखास घडणार, उद्धव ठाकरे कमालीचे नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे प्रमुख पाहुणे म्हणून नाव टाकण्यात आले आहे. देशभरात भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात इंडिया नावाने आघाडी स्थापन झालेली असताना या आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे की नाही हा प्रश्न चर्चिला जात आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाटते की शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे टाळावे.

टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघे मंगळवारी एकाच मंचावर येणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे चांगलेच खटकत असल्याचे समजते. शरद पवार यांनी सोहळ्याला हजेरी लावता कामा नये अशी त्यांची इच्छा असून तसा निरोप त्यांनी पवारांपर्यंत पोहोचवल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये अशी उघड भूमिका ठाकरे यांच्या पक्षाने घेतली आहे. मोदी आणि पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले की, त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होणार आणि त्याचा फटका आघाडीला बसणार, असे उद्धव ठाकरे यांना वाटते. साहजिकच पवारांनी हा कार्यक्रम टाळावा, असे त्यांचे म्हणणे असल्याचे कळते.