पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन!, उद्धव ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर करत भाजपचा सावंतांवर पलटवार

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायात चप्पल घालून २६/११ हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे राज्यपालांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही राज्यपालांवर टीका करताना भारताच्या संस्कृतीची आठवण करून दिली आहे. मात्र भाजपा महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

आज २६/११ हल्ल्याला (Mumbai Terror Attack) १४ वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून मुंबई अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहिली. राज्यपाल मात्र चप्पल न काढता शहिदांना अभिवादन करताना दिसले. 

यावरून टीका करताना काँग्रेसचे सचिन सावंत म्हणाले, अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.

परंतु भाजपाच्या केशव उपाध्ये यांनी सचिन सावंत यांच्या या टीकेला अज्ञानाचे प्रदर्शन म्हटले आहे. सचिन सावंत, केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान पोलिस प्रशासनाशी बोलून घेतले असते. 26/11 च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पल काढली जात नाही. तशा पद्धतीचे ब्रिफिंग पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अभिवादन करायला येणार्‍या मान्यवरांना करीत असतात. हा नियम आहे, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पायातून बूट काढल्याने नंतर मग सर्वांनी ते काढले. गेल्यावर्षीचा हा व्हीडियो पहा. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवठाकरे हे अभिवादन करीत आहेत आणि त्यांच्या पायात बूट आहे. मग तेव्हाही मराठी संस्कृती न जपल्याची आठवण आपल्याला झाली होती का?