शरद पवारांच्या विचारांच्या व्हायरसचे निर्जंतुकीकरण करणार, सदावर्तेंचा घणाघात

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार यांची लायकी आता सगळ्यांना कळली असल्याचे त्यांनी म्हटले.  शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे.सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवारांच्या विचारांच्या व्हायरस चे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.

दरम्यान,  या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचाही फोटो लावल्याचे पहायला मिळाले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (State Transport Co-operative Bank) निवडणुकीसाठी सदावर्तेंच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

ते म्हणाले,  स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकऱ्यांना अध्यक्ष पद मिळालं नाही. या निवडणुकीत आमचं पॅनल लढणार असून त्यात विजयी होईल, असंही त्यांनी म्हटले.   शिंदे सरकार आलं आणि पवारांच्या घरावरील हल्याच्या खोट्या गुन्ह्यात डांबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले. पवार यांना धमकी कोण देणार असा प्रश्न करताना दाऊद हा कोणाच्या कार्यकाळात वाढला असा सवाल त्यांनी केला.