सुरेश कलमाडीही भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन ‘पावन’ होणार ?

पुणे : काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचा पुणे फेस्टिव्हल या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी आणि भाजपच्या जवळकीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळाप्रकरणामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागले होते. यानंतर काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, आता १० वर्षे उलटूनही काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना लांब ठेवले आहे.

सुरेश कलमाडी यांच्याविरुद्धचा खटला अजूनही सुरु असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता सुरेश कलमाडी यांनी स्वत:वरील कलंक धुवून काढण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन ‘पावन’ होण्याचा मार्ग स्वीकारला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपने अनेक घोटाळ्यांचे आरोप असणाऱ्या नेत्यांना पक्षात घेऊन पावन केले आहे आता कलमाडी यांनाही भाजप पावन करून घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.