‘उत्तर प्रदेशसह आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने काळे कृषी कायदे मागे घेतले’

मुंबई – उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे. असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे देशाताली शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनवणारे होते. एमएसपीचे प्रावधान या कायद्यात नव्हते तसेच शेतकऱ्याच्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपुष्टात येऊन ही बाजारपेठही खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालणारे कायदे होते. हे काळे कायदे रद्द करावेत म्हणून देशभरातील बळीराजाने आंदोलन छेडले या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस पक्ष पहिल्यादिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करून काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी केली होती. तसेच प्रदेश काँग्रेसने ६० लाख शेतक-यांच्या सह्यांचे निवदेन राष्ट्रपतींना पाठवले होते.

एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसेल आहेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांना एकदाही भेटण्यास वेळ मिळाला नाही. या शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. जवळपास ७०० शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान प्राण गमावले. दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या, कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून भाजपाने हिणवले परंतु शेतकरी मागे हटला नाही. आजचा निर्णय हा या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, देशातील जनतेच्या निर्धाराचा आहे. एकजुटीने लढा दिल्यास सत्ताधारी कितीही शक्तीशाली असले तरी त्यांना झुकावेच लागते हे आज बळीराजाने दाखवून दिले आहे.

केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामागे उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची देशभर प्रचंड पिछेहाट झाली. जनमत भाजपाच्या विरोधात आहे. या पराभवानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या. उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित आहे. शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारला कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण हा निर्णय शेतक-यांच्या हितासाठी नाही तर पराभवाच्या भितीने घेतला आहे. मोदींना शेतक-यांचा खरा कळवळा असता तर लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडून मारले त्या अजय मिश्रा यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी केली असती पण त्यांनी अद्याप तसे केले नाही. या लढ्यात शेतक-यांचा विजय झाला आहे पण हमी भाव आणि शेतक-यांच्या इतर प्रश्नांवरील आमचा लढा सुरुच राहील. मोदींची कार्यपद्धती पाहता ते निवडणुका झाल्यावर पुन्हा असे कायदे आणू शकतात त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.