मुंबई : 2015 सालापासून महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओवरून जनतेशी थेट संवाद साधत आहेत. या विशेष कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे, येत्या 30 एप्रिल रोजी प्रसारण होत आहे.
यानिमत्ताने मन की बात कार्यक्रम मुंबईत मोठ्या स्तरावर पाहण्यात तसेच ऐकण्यात यावा, याकरिता राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधानांच्या 100 व्या मन की बातचा विशेष कार्यक्रम भायखळा महिला कारागृह, मुंबई येथे आयोजित करण्याची परवानगी देण्याबाबत तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हमाल बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना, मंत्री लोढा यांनी पत्र लिहिले होते.
त्यानुसार भायखळा कारागृहातील महिलांसाठी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हमाल बांधवांसाठी, पंतप्रधानांचा मन की बात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाली असून, रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी, सकाळी 11 वाजता, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.