भोंग्यातून महागाई, इंधनाचे दर कसे वाढले ते सांगा! आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज आदित्य ठाकरे (Aaditya thackeray)  यांनीही भोंग्यावरून प्रश्न विचारला असता मनसेला टोला लगावला आहे. महागाई इतकी का वाढली? पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Disel price) का वाढत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांना भोंग्यावरून द्या असं आदित्य ठाकरे यांनी सुनावलं आहे. त्याआधी जेव्हा त्यांना मनसेबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता तेव्हा संपलेल्या पक्षांबाबत मी बोलत नाही असं मनसेला त्यांनी सुनावलं होतं.