द काश्मीर फाईल्समधून द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली; पवारांचा घणाघात

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदीजी, तुम्ही काश्मीर फाईल्स बघण्याचं आवाहन करू लागला तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आलाय. या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेलं. शिवाय समाजा-समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल.तो चित्रपट अतिशय चांगला आहे , बघितला पाहिजे,असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं शरद पवार म्हणाले आहेत.