योगींनी अतिक अहमदकडून जप्त केलेल्या जमिनीवर बांधले ७६ फ्लॅट, घरमालकांना चाव्या सुपूर्द केल्या 

Yogi Adityanath – सीएम योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमधील गरीबांसाठी बांधलेल्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी लाभार्थ्यांना 76 फ्लॅटच्या चाव्या दिल्या. हि सर्व घरं गुंड अतिक अहमदकडून (Atiq Ahmed) जप्त केलेल्या जमिनीवर बांधण्यात आली आहेत.  यावेळी मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदीही उपस्थित होते. याशिवाय भाजपचे आमदार सिद्धार्थनाथ सिंह, फुलपूरच्या खासदार केशरी देवी पटेल, खासदार रिता बहुगुणा जोशी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यापूर्वी, एक लाभार्थी जाहिदा फातिमा भावूकपणे म्हणाल्या, मी खूप आनंदी आहे. स्वतःचे घर असावे हे माझे आणि माझ्या आईचे स्वप्न होते. आम्ही 30 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहोत. योगीजींचे जितके आभार मानू तितके कमीच आहे.

विशेष म्हणजे अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त झालेल्या लुकरगंजच्या जमिनीवर गरिबांसाठी 76 फ्लॅट पूर्ण झाले आहेत, जे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. माफिया अतिक अहमद यांच्यावर कारवाई करताना सप्टेंबर 2020 मध्ये ही जमीन त्यांच्या ताब्यातून मोकळी करण्यात आली.

त्यानंतर 2021 मध्ये मुख्यमंत्री योगी यांनी या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट बांधण्याची घोषणा केली. 26 डिसेंबर 2021 रोजी सीएम योगींनी त्याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर प्रयागराज विकास प्राधिकरणाने ही योजना राबवण्यास सुरुवात केली. आता अवघ्या दीड वर्षात येथे 76 फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना केवळ साडेतीन लाख रुपयांमध्ये दोन खोल्यांचे फ्लॅट दिले जाणार आहेत. या 76 फ्लॅटसाठी 6000 हून अधिक लोकांनी अर्ज केले होते.फ्लॅटचे वाटप लॉटरीद्वारे झाले.