मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेला अभिनेता अक्षय वाघमारेचे एक नवे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक मालिका व सिनेमांमधून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचे पहिलेच रोमँटिक गाणे आहे. ‘हळवेसे’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे जीवन मराठे व निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केले आहे. मुळशी येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे.
अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगेश अनिल तावर हे गाण्याचे दिग्दर्शक असून अमोल घोडके हे कार्यकारी निर्माते आहेत. राहुल झेंडे यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले असून वैभव लमतुरे हे प्रॉडक्शन हेड आहेत.
श्रीनिवास कुलकर्णी व मधुसुधन कुलकर्णी यांचे हे तिसरे गाणे असून यापूर्वीच्या ‘मन हे वेडे’ व ‘सुख दुःख सारी’ या आधीच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पोच पावती मिळाल्याने याही गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी विश्वास निर्माते श्रीनिवास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘हळवेसे’ या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.
हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की ‘या गाण्याच्या माध्यमातून एका इव्हेंट मॅनेजरची छोटीशी प्रेमकथा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, गाण्याची सर्व टीम तरुण उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमँटिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.’ अक्षय व सानियावर निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.
हे ही पहा: