मोबाईल गेममुळे 14 वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; तुमची मुलेही ‘हा’ गेम खेळत नाहीत ना ?

मुंबई – मोबाईल गेममुळे मुंबईत एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना भोईवाडा भागातील आहे या विद्यार्थ्याने गेममधील आव्हान पूर्ण करण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलल्याचे या घटनेचा तपास करणाऱ्या भोईवाडा पोलिसांकडून समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सातवीच्या विद्यार्थ्याला फ्री फायर गेम्स खेळण्याची सवय होती. इतर काही गेम्ससोबतच या गेमवर भारत सरकारने बंदी घातली असली तरी हा गेम छुप्या पद्धतीने खेळला जात आहे.

मुलाचे पालक आणि शिक्षक सांगतात की, मुलगा अभ्यासात चांगला होता आणि त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास मुलाने वडिलांना फोन केला होता. मुलाचे वडील प्रवासात असल्याने बोलू शकले नाही. मुलाच्या वडिलांनी परत फोन केला असता मुलाने फोन उचलला नाही. मुलाची आईही कामानिमित्त बाहेर गेली होती. दोघेही घरी पोहोचले असता मुलाने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडल्यानंतर बालक मृतावस्थेत आढळून आले.

याआधी मध्य प्रदेशातूनही असेच प्रकरण समोर आले होते. ऑनलाइन गेममध्ये हजारो रुपये गमावून एका मुलाने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षीय मुलाचे एका गेमच्या अफेअरमध्ये 40 हजार रुपये गमावले होते, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या मुलाला फ्री फायर गेमची देखील सवय होती.