अनिल देशमुखांच्या मुलाने कोर्टात केला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. मनी लाँन्ड्रिग प्रकरणी त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोप केला आहे.

न्यायालयाने हृषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.हृषिकेश यांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता आणि त्याने वडिलांना बेकायदा कमावलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यास मदत केली होती, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात केला आहे.

आतापर्यंतच्या तपासात देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नियंत्रणाखाली ११ कंपन्या असल्याचे उघड झाले आहे. त्यातील बहुतांशी कंपन्यांमध्ये हृषिकेश संचालक किंवा समभागधारक आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेली ४.७० कोटी रुपयांची रक्कम हृषिकेशने वडिलांसोबत वालामार्फत वळवली, असाही दावा ईडीनं केला आहे.