काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ

पुणे  : पुणे (Pune) जिल्ह्यातील काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी (Black-yellow taxis) १८ एप्रिल पासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे २१ रूपये करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणेचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती) बैठकीत खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

काळ्या पिवळ्या टॅक्सीचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलीब्रेशन) १८ एप्रिल ते १६ जून २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित वाहने मीटर कॅलिब्रेशनसाठी या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सादर करावीत. जे टॅक्सी चालक १८ एप्रिलपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच टॅक्सीधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या टॅक्सीधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी प्रत्येक दिवसासाठी १ दिवस मात्र किमान ७ दिवस आणि कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र किमान ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.