पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवसामध्ये २.२० कोटींच्या वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

महावितरणकडून मोहिमेत वीजचोरांना दणकावीजचोरीमध्ये कारावासाच्या शिक्षेची तरतूद

Mahavitaran : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १७२७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यात  वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या १३९० वीजचोऱ्यांचा समावेश आहे. पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत एकाचवेळी दिवसभर झालेल्या या कारवाईमध्ये सुमारे १३ लाख ४९ हजार युनिट म्हणजे २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

दरम्यान वीजचोरी उघड केल्यानंतर संबंधितांविरुद्ध महावितरणकडून फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी रितसर अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरु आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महिन्यातून एक दिवस वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे शनिवारी (दि. २) सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींचे १९ हजार ९०० वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये (कंसात वीजचोरीची रक्कम) पुणे जिल्हा- ८३८ (१ कोटी २८ लाख ५८ हजार), सातारा- १६६ (१४ लाख ७६ हजार), सोलापूर- ३१९ (२५ लाख ४९ हजार), कोल्हापूर- १५४ (२८ लाख ७९ हजार) व सांगली जिल्ह्यात २३० (२२ लाख १६ हजार) अशा एकूण १७२७ ठिकाणी २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – छगन भुजबळ

तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस