कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गत जिल्ह्यात ३४ कोटी ७७ लाख अनुदान वितरीत

पुणे : शेतकऱ्यांना (Farmer) कृषि अवजारांच्या (Agriculture) खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनाअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण आदी योजनांतर्गत कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ६ हजार १३४ लाभार्थ्यांना ३४ कोटी ७७ लाख ३३ हजार रुपये इतकी अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य पिके, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य पिके, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उप अभियान आणि राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनाअंतर्गत त्या त्या बाबीमध्ये समाविष्ट यांत्रिक अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले जाते.

कृषि विभागाच्या योजनांची ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या बाबी शेतकऱ्यांना ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ पातळीवरुन प्रभावी संनियंत्रण शक्य झाले आहे.

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषि व औजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी बाबी कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गत अनुदानासाठी समाविष्ट आहेत.

जिल्ह्यामध्ये कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गत संगणकीय सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आवश्यक अटींची पूर्तता केलेल्या ६ हजार १३४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

तालुकानिहाय लाभार्थी व वर्ग केलेले अनुदान पुढीलप्रमाणे- आंबेगाव- ४९४ लाभार्थी- २ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपये, बारामती- ८२१ लाभार्थी- ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपये, भोर- ३४५ लाभार्थी- २ कोटी ४० लाख २० हजार रुपये, दौंड- ७९९ लाभार्थी- ४ कोटी १० लाख १९ हजार रुपये, हवेली- २३९ लाभार्थी- १ कोटी २५ लाख ६३ हजार रुपये, इंदापूर- ७८२ लाभार्थी- ४ कोटी ७० लाख ४८ हजार रुपये, जुन्नर- ५२२ लाभार्थी- ३ कोटी 3 लाख ११ हजार रुपये, खेड- ३९४ लाभार्थी- २ कोटी ३३ लाख ५ हजार रुपये, मावळ- ६१ लाभार्थी- ५९ लाख ६९ हजार रुपये, मुळशी- ८९ लाभार्थी- ९५ लाख ३८ हजार रुपये, पुरंदर- ६१२ लाभार्थी- २ कोटी ६४ लाख ६३ हजार रुपये, शिरुर तालुका- ८८८ लाभार्थी- ४ कोटी ८७ लाख ७० हजार रुपये आणि वेल्हे तालुक्यात ८८ लाभार्थ्यांना ४८ लाख ६ हजार इतके अनुदान वर्ग केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली आहे.