गुंड गजा मारणेच्या २२ वर्षीय मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या २२ वर्षीय मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजा मारणे याच्या मुलाने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथमेश गजानन मारणे (वय २२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला खडकवासला येथे फिरण्यास नेले होते. फिरून घरी परत येत असताना त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे एका रूममध्ये तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

प्रथमेशने तिथे तिच्या संमतीशिवाय, नकळतपणे, चोरून, परस्पर अश्लील व्हिडिओ बनवले. सदर व्हिडीओ डिलीट करण्याची फिर्यादीने विनंती केली असता आरोपीने टाळाटाळ केली. फिर्यादीने त्याला तुझ्या या कृत्याबाबत पोलिसांत तक्रार देईल, असे बोलले असता तुला काय करायचे ते कर व ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.