पत्नीपीडितांनी पिंपळाची पूजा; प्रदक्षिणा घालून भांडखोर पत्नीपासून वाचवण्यासाठी देवाला घातले साकडे  

छत्रपती संभाजीनगर – जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून एका बाजूला वटपौर्णिमा साजरी केली जात असताना भांडखोर पत्नीमुळे संसार उघड्यावर पडलेल्या पत्नीपीडितांकडून देखील आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज भागातील करोडी येथील आश्रमात ही आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.

दरवर्षी छत्रपती संभाजीनगरच्या करोडी येथील आश्रमात पत्नी पीडितांच्या वतीने वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी पत्नीपीडितांकडून विविध घोषणा देत पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या प्रदक्षिणा मारण्यात येते. तसेच पिंपळाची पूजा करुन आणि प्रदक्षिणा घालून भांडखोर पत्नीपासून वाचवण्यासाठी देवाला साकडे सुद्धा घातले. गेल्या कित्येक वर्षांपासून पत्नीपीडितांकडून हा उपक्रम वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी राबवला जात असतो. यावेळी मोठ्याप्रमाणावर पत्नीपीडित आपला सहभाग नोंदवत असतात.

देशात बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असल्याने अनेक महिला या कायद्याचा दुरुपयोग करून किरकोळ कारणावरुन आपल्या पतीविरोधात गंभीर तक्रारी नोंदवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. विशेष म्हणजे अशा तक्रारीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पत्नीपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पत्नी पीडितांना सावरण्यासाठी अॅड. भारत फुलारे यांनी वाळू भागातील करोडीत 6 वर्षांपूर्वी आश्रम उभारला आहे.