संभाजी महाराजांचे यथोचित स्मारक आणि पुरंदर येथे शासकीय जन्मसोहळा व्हावा; आपची मागणी

Pune – सध्या छत्रपती संभाजी राजांना आदर्श मानत त्यांच्या नावाची राजकीय बॅनरबाजी चालू आहे आणि प्रत्यक्षात कृती मात्र शून्य. त्यामुळेच स्वराज्याच्या आणि सुराज्याच्यासाठी आग्रही असलेली आम आदमी पार्टी (AAP) त्यांच्या जन्मोत्सवाचा किल्ले पुरंदर येथील सोहळा शासकीय इतमामात व्हावा अशी मागणी करीत आहे, असे आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वराज्य रक्षणासाठी आपल्या जीवाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव घेत प्रस्थापित राजकारणी मात्र तत्त्वहीन युती करत तर कधी खोके घेत सत्ता काबीज करीत आहेत. त्यामुळे सत्तेसाठी सर्व तडजोडी करणारे प्रस्थापित राष्ट्रवादी शिवसेना भाजप शिंदे गट आणि तडजोडी करणारे अजित पवार असोत किंवा विजय शिवतारे, या नेत्यांना छ. संभाजी राजे याच्या आदर्शांशी काही देणे घेणे नाही असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला.

त्यामुळेच वढू तुळापूर येथील स्मारक विकास निधी सुद्धा अजून उपलब्ध करून दिला दिलेला नाही आणि त्यावरची सविस्तर चर्चा सुद्धा अधिवेशनादरम्यान होऊ शकली नाही. खरे तर संभाजी महाराजांच्या वडू येथील स्मारकाचा ऐतिहासिक स्मारक म्हणून विकास करणे योग्य ठरेल. महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान असलेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे राजे होते. ते कुठल्याही एका धर्म जात पंथाचे राजे नव्हते. त्यामुळे किल्ले पुरंदर येथे साजरा होणारा जन्मोत्सव सोहळा हा शासकीय पद्धतीने व संभाजीराजे हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे याचे भान ठेवत योग्य सन्मानाने व्हावा आणि दरवर्षी यास शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले जावे. संभाजी राजेंचा जन्म सोहळा ही बाब पुरंदर तालुक्यास नव्हे तर जिल्ह्यासाठी गौरवाची असेल असे आप पुरंदर चे अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगीतले.

त्याचबरोबर राष्ट्रीय प्रतीके कायदा 1950 मधील तरतुदीनुसार व्यापारी आणि व्यावसायिक वापराला निर्बंध असलेल्या प्रतीकांच्या यादीत छत्रपती संभाजी राजे यांचे नाव पण सामाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आप ने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. या पत्रकार परिषदेत मुकुंद किर्दत यांचे सह पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड, संजय नाना जगताप, सह संयोजक,अमोल कड, संघटक स्वप्नील गायकवाड सचिव, शहाजी कोलते सदस्य, शंकर थोरात, दिनेश वर्मा आदी उपस्थित होते.