सत्तेत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही कामधंदा उरलेला नाही – मिटकरी 

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेतील आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही गुरूवारी एकापाठोपाठ 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. जातीयवाद, कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.

एका ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेलं भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत या सर्वां चा दाखला देत फडणविसांनी शरद पवारांचा खरा चेहरा समोर आणण्याचे प्रयत्न केले आहेत. मनसेनंतर भाजपने देखील त्याच मुद्द्यावरून हल्लाबोल केल्याने राष्ट्रवादी चांगलीच घायाळ झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान,  देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सत्तेत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळेच १४ एप्रिलचे निमित्त साधून त्यांनी ही १४ ट्विटस केली आहेत. भाजप हा मुस्लीमविरोधी पक्ष असेल तर त्या पक्षात शाहनवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे काय करत आहेत? भाजपचा मुस्लिमांना विरोध असेल तर याचा अर्थ त्यांना संविधान मान्य नाही. तुम्हाला संविधान हवे की नको, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे मिटकरी यांनी म्हटले.