आप ने स्थापन केली नवीन समिती, अमित पालेकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

पणजी – आम आदमी पक्षाने (AAP) फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने सुरुवात करण्यासाठी आणि पक्षाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी गोवा राज्य युनिटचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अॅड. अमित पालेकर (Amit Palekar) आणि बाणावलीतील आप चे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास आणि वेळळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्लीतील आप च्या आमदार आणि गोवा युनिट प्रभारी आतिशी यांनी पक्षाच्या पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

आतिशी म्हणाल्या, की “गोव्यातील लोकांनी आप वर विश्वास ठेवला आणि आम्हाला मतदान (Voting) केले, ज्यामुळे बाणावली आणि वेळळीमध्ये आप च्या उमेदवारांचा विजय झाला. पक्ष म्हणून ‘आप’ केवळ निवडणूकच लढवित नाही; तर गोमंतकीयांचा आवाज बनत आहे आणि भविष्यातही आम आदमी पक्ष असाच काम करत राहील. २०२७च्या आगामी निवडणुकीत आप सरकार स्थापन करेल असा आमचा विश्वास आहे, ज्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

आप चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर म्हणाले, की २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आप चे उमेदवार विधानसभेत ( Legislative Assembly) निवडून आले नसले तरी आप ने विरोधी पक्ष म्हणून अतिशय प्रभावी भूमिका बजावली आहे. आता गोमंतकीयांनी ‘आप’ला संधी दिल्याने, आगामी विधानसभा अधिवेशनात आमचे आमदार गोमंतकीयांच्या बाजूने आवाज उठवतील. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष या नात्याने, प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी नवीन नेते तयार करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘आप’च्या प्रचार समितीचे अध्यक्ष महादेव नाईक (Mahadev Naik)  म्हणाले, की गोमंतकीयांचे असे अनेक प्रश्न आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात ‘आप’ हे मुद्दे उपस्थित करणार.

आप महिला शाखेच्या अध्यक्षा प्रतिमा कुतीन्हो ( Pratima Coutinho) म्हणाल्या, की राज्यात एकूण लोकसंख्येत ५०% महिला आहेत. अलीकडेच महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol – Diesel) दर तसेच भाज्या व गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महिलांना घर चालविताना अनेक अडथळे येत आहेत. आप ने दिल्ली आणि पंजाबमधील महिलांसाठी विविध उपक्रम सुरू करून त्यांचे जीवन बदलले आहे. त्याचप्रमाणे ‘आप’ गोव्यातील महिलांचे प्रश्न सोडविणार.

‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक (Valmiki Naik) म्हणाले, की पक्षाच्या उत्कृष्ट कार्यामुळे २०२२च्या विधानसभा निवडणुकीत दोन जागा आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत एक जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. पक्ष संघटनाकडे डोळा ठेवून ‘आप’ने नवीन कार्यकरी स्थापन केली आहे, जी राज्याच्या भल्यासाठी काम करेल.

आप गोवाच्या मीडिया टीमचे मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक म्हणाले, की आप जेव्हा सामान्य लोकांचे प्रश्न मांडतो, तेव्हा सरकार घाबरते. अॅड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही गोव्याच्या लोकांच्या समस्या सतत मांडू आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करू.”