असिस्टंट कमांडंटसाठी अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव पास होणाऱ्या भावना यादवला दोन वेळा यशाने हुलकावणी दिली होती..

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये 28 वर्षीय भावना यादवने मुलींमध्ये देशांत पहिला क्रमांक पटकाविला, तर एकूण यादीमध्ये 14 वा क्रमांक मिळवला.

भावना मुळची सांगलीतील खानपूर तालुक्यातील नागेवाडी गावची. मात्र वडील सुभाष यादव मुंबईतील पोलिस दलात सहायक फौजदार असून ते बोरविलीत वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीतील सेंट झेवियर्स शाळेत झाले.

मागील अनेक वर्षांपासून यादव कुटुंबीय मीरा रोडला स्थायिक झाले. भावनाला अगदी लहानपणी पासून केंद्रीय सेवेत जाण्याची इच्छा होती. 2015 पासून तिने यूपीएससीसीची परीक्षा देण्यास सुरुवात केली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ती दोन वेळेस उत्तीर्ण झाली. मात्र मैदानी चाचणीत तिला अपयशाला सामोरे जावे लागले.

ही परीक्षा 2020 मध्ये घेण्यात आली होती. 4 जानेवारीला तिचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत एकूण 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात भावना 14 व्या क्रमांकावर आहे. ती देशांत मुलींमध्ये पहिली आली. महाराष्ट्रातील ती एकमेव मुलगी आहे जी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.