सरकारला जागे करण्यासाठी विद्यार्थ्यांवर आली जागरण गोंधळ आंदोलनाची वेळ

पुणे –  विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणलेल्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात व झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी अभाविप पुणे महानगराच्या वतीने काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

कोवीड च्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रात आधीच विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात जाऊ शकते असा निर्णय घेतला. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्या मध्ये केलेल्या बदलामुळे विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. यामुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न केला जाईल. राज्य शासनाच्या या भ्रष्ट निर्णयाच्या विरोधात अभाविप ने सातत्याने निदर्शने, आंदोलने केली. परंतु, यावर काही एक उत्तर विद्यार्थ्यांना मिळाले नाही.

विद्यार्थ्यांच्या वारंवार चाललेल्या संघर्षाकडे राज्य सरकार ज्या प्रकारे दूर्लक्ष करत आहे, त्यावरून हे सरकार खरच झोपी गेलय की काय? असा प्रश्न प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी उपस्थित केला. तरी, या राज्य सरकारला जागे करण्यासाठी, आणि विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होण्यापासून थांबविण्यासाठी अभाविप, पुणे महानगराच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भर दिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तीव्र निषेध दर्शविण्यात आला. यावेळी अभाविप पुणे चे महानगर मंत्री शुभंकर बाचल तसेच इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.