शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण : DCP योगेश कुमार यांना हटवले

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)  यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या घडामोडींनंतर आता DCP झोन २ चे पोलीस (Police) उपायुक्त योगेश कुमार (Yogesh Kumar)  यांना त्यांच्या पदावरुन तात्पुरते हटवण्यात आले आहे. डीसीपी, डिटेक्शन, नीलोत्पल यांना झोन 2 चा प्रभार देण्यात आला आहे. दरम्यान, नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी आयुक्त पांडे यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.