रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

ठाणे : आपली परिस्थिती पहायला मी आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya thackeray) यांनी जिल्ह्यातील शहापूर(shahapur) तालुक्यातील माळ, बिवलवाडी(Bibalwadi), गोलभान(Golbhan) या दुर्गम भागातील जनतेला दिलासा दिला.

भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न मिटेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य सांगितल्यानंतर सौरऊर्जेच्या(solar energy) माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वस्त केले.

यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, शहापूर, पालघर, ठाणे याभागात पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे दुर्गम भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वन तलाव, विहिरी यांच्या माध्यमातून भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी आणून विहिरीत टाकले जाईल आणि त्यानंतर सोलर पंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल असे सांगितले.

शहापूर तालुक्यातील माळ त्यानंतर पालघर जिल्ह्यातील सावर्डे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेवुन मंत्री ठाकरे यांचे कसारा घाटाच्या माथ्यावर असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथे दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले. रणरणत्या उन्हात४५० लोकसंख्या असलेल्या या गावातील कुडाच्या घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंत्री ठाकरे यांचे गावातील महिलांनी पारंपरिक लोकगीत म्हणून स्वागत केले.