“शेवटचा सिनेमा पठाण बघितला, त्यामध्ये भगवे-बिगवे बिकिनी घातलेलं सगळं बघितलं”, अजित पवारांचं मिश्किल उत्तर

चिंचवड\पुणे- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच सकाळला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अजित पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यादरम्यान त्यांनी अनेक वाद झालेल्या पठाण (Pathaan) सिनेमाबद्दलही लक्षवेधी वक्तव्य केले आहे.

‘तुम्ही शेवटचा कोणता सिनेमा बघितला?’ असा प्रश्न अजित पवारांना (Ajit Pawar On Pathaan) विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, शेवटचा सिनेमा पठाण बघितला. पुण्यावरुन मुंबईकडे जात असतांना एकाने मला लॅपटॉवर लावून दिला होता. त्यामध्ये मग भगवे-बिगवे बिकिनी घातलेलं सगळं बघितलं. असं म्हणून त्यांनी सभागृहात हशा पिकवला.

दरम्यान शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर पठाण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकीनीवरून बरेच राजकारण झाले होते. परंतु या वादाचा पठाणवर कोणताही परिणाम झाला नाही आणि हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.