‘थाला’प्रेमींना आतापासूनच अश्रू अनावर! स्वत: धोनीने दिले आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत, पाहा काय म्हणाला?

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) सध्याच्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती (MS Dhoni Retirement) घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळतो आहे. त्याने शुक्रवारी (21 एप्रिल) चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविल्यानंतर सांगितले की हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा (MS Dhoni On Retirement) टप्पा आहे.

41 वर्षीय धोनीने स्वतः कबूल केले की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. सध्याचा हंगाम धोनीचा शेवटचा आहे आणि आयपीएल 2023 नंतर तो निवृत्ती जाहीर करेल असा अनेकांचा अंदाज आहे.

“मी कितीही वेळ खेळलो तरी चालेल, पण हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे. त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना चेन्नईच्या होम ग्राउंडवर येऊन आयपीएल सामने पाहण्याची संधी मिळाली आहे. इथे येऊन छान वाटतं. प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे,” असे सामना विजयानंतर धोनीने म्हटले.