MIvsGT: मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने मान्य केली चूक, सांगितले कुठे कमी पडली टीम?

अहमदाबाद-  मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात (Mumbai Indians vs Gujrat Titans) झालेला आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना (Qualifier 2) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) संघाने गाजवला. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या १२९ धावांच्या (६० चेंडू) धुव्वादार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकात ३ बाद २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला १८.२ षटकात १७१ धावाच करता आल्या. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची कोंडी झाली आणि त्यांनी ६२ धावांच्या फरकाने सामना गमावला. या पराभवासह मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली असून गुजरातने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शुबमन गिलचे कौतुक केले. तसेच मुंबईचा संघ कुठे कमी पडला, याबद्दलही भाष्य केले.

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, शुबमनने या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली आणि त्याने आपल्या डावात आणखी २० ते २५ धावा केल्या. पहिला डाव संपल्यानंतर आम्ही खूप सकारात्मक होतो. ग्रीन आणि सूर्या यांनी चांगली फलंदाजी केली पण आम्ही हरलो. पॉवरप्लेदरम्यान आम्हाला झटपट धावा काढता आल्या नाहीत. एका फलंदाजाने शेवटपर्यंत खेळ करावा अशी आमची इच्छा होती पण आम्ही ते करू शकलो नाही. या विजयाचे श्रेय आपण गुजरातला द्यायला हवे, ज्यांनी चांगला खेळ केला.

रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, इशान किशन दुखावल्यामुळे अचानक बाहेर पडणे निश्चितच धक्कादायक होते. पण अशा गोष्टींसाठी आपण तयार असले पाहिजे आणि त्याचा जास्त विचार करू नये. या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.

मुंबई इंडियन्सच्या या मोसमाचा शेवटही या सामन्याने झाला. रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात संघाची सर्वोत्तम फलंदाजी ही या हंगामातील सर्वात मोठी सकारात्मक बाजू असल्याचे सांगितले. जे त्याला पुढील हंगामातही सुरू ठेवायला आवडेल.