अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना झापलं; म्हणाले,काही मंत्री…

मुंबई  – तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात …काहीजण सहज बोललो म्हणत आहेत… तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले.

आज जनता दरबार उपक्रमास आले असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले… विनाशकाले विपरीत बुद्धी… हेच त्यांना बोलले पाहिजे… काय आपण बोलतोय… मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का… मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत संविधान… कायदा… नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये हे चुकत आहेत असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली… बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडतेय… सरकार काय करतंय?… ठाण्यात किसननगर भागात शिंदे – ठाकरे गटात राडा झाला अशी राडेबाजी करुन चालणार नाही…पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालेल आहे असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? … काहींचा तर ३० – ३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो जास्त गाड्या असल्या की नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाहीय… सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना? … काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण… कोण त्याला काय करतंय… तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

माझा पाच दिवसाचा परदेशातील कार्यक्रम फार पूर्वी ठरला होता तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील शिबीराला एक दिवस उपस्थित राहून गेलो मात्र एवढया दिवसात मी प्रेस समोर आलो नाही तर अजित पवार कुठे गेले आहेत. अजित पवार उपलब्ध नाहीत. अजित पवार नाराज… फारच प्रेम आमच्यावर ऊतू जातं.. अशा काही बातम्या येत होत्या. जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते. मात्र चार – पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी मी इथे नव्हतोच. त्यामुळे स्टेटमेंट आले नाही असा खुलासा रोज येणाऱ्या बातम्यावर अजित पवार यांनी केला.

विरोधी पक्षनेता म्हणून नागरीक म्हणून सरकार आल्यापासून कसं काम सुरू आहे सरकार कसं आलं या खोलात जात नाही. ४० आमदार कसे फुटले आणि पुढच्या घडामोडी आता ते प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यावेळेपासून प्रशासन पाहिजे असे काम करताना दिसत नाही. सुरुवातीला बराच काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांवर राज्याचा लोढ होता. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार केला १८ लोकांचा समावेश केला. २० लोकांचे मंत्रीमंडळ आहे. त्यावेळी किती लोकांनी चार्ज घेतला. काहीजण आपल्या मिळालेल्या खात्यावर नाराज आहेत. मी अनेक वर्षाच्या म्हणजे ३२ वर्षाच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे . बैठका कशा घेत होतो. वेळेवर बैठका होत होत्या. बैठका रद्द होत नव्हत्या अधिकार्‍यांना ताटकळत बसावे लागत नव्हते परंतु आता तसं अजिबात होत नाही. पोलीसांचे चांगले प्रशासन म्हणून जगभर ओळख आहे परंतु या सरकारच्या काळात राज्यात पोलीस तणावाखाली काम करत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलीस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरीष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलीस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात त्यांना डायरेक्ट आदेश सीएम कार्यालयातून येतात असेही अजित पवार म्हणाले.

जनतेचा विश्वास पोलिसांवर आजही आहे. कोरोनाच्या काळात आम्ही स्वतः पाहिले आहे. पोलिसांना जनतेने सहकार्य केले होते.आता चार महिन्यात तुमच्या – माझ्या राज्यात चाललेली जी परिस्थिती आहे ती अशीच जर राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केली.

पोलीस आणि सचिवांनी आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. भारतात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळू देता कामा नये.पण काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे जवळचे असतात त्यांनी जाऊन हे लवकर दुरुस्त केले तर सर्वांनाच अडचणीचं होणार आहे हे सांगितले पाहिजे. तशापध्दतीने पुढच्या गोष्टी व्हाव्यात जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली परंपरा, घडी आहे ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

मुंबई आणि परिसरात गोवर रोगाची साथ जोरात आहे. राज्यसरकारचा आरोग्य विभाग काय उपाययोजना करतोय. तो यामध्ये कमी पडत आहे. त्यांनी घरोघरी जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत संपर्कात होते हेही आवर्जून सांगितले.

सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत की, आता महागाईवर बोलून उपयोग नाही. दहा वर्षांपूर्वी ४० हजाराचा मोबाईल हा ४ हजारात मिळतो याचा अर्थ महागाई कमी झाली आहे. असा दावा आहे किती हास्यास्पद दावा आहे हा… आजदेखील फोन कुठल्या कंपनीचा आहे तो लाखभर रुपये आहे. महागाईवर थातूरमातूर उत्तर देत आहेत असा जोरदार टोला अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना लगावला.

आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या सर्वच पक्षाच्या वरिष्ठांनी कारखानदारी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांच्या काळात बाहेरचे मुख्यमंत्री, बाहेरून आलेले वरीष्ठ लोकं, इथे बसून महाराष्ट्र सोडून या राज्यात जा त्या राज्यात जा… अशापध्दतीने सांगत आहेत. हे राज्याला भूषणावह आहे का? मोठे प्रकल्प गेले ना? उदय सामंत यांचे स्टेटमेंट ऐकले की ३० दिवसात श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का गेले हे सांगणार आहेत. जरुर सांगा.. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही आमच्या चुका असतील तर त्या समोर आल्या पाहिजेत तुमच्या पाच महिन्याच्या नाकर्तेपणामुळे ते प्रकल्प आपल्याकडे राहण्याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतले नसतील आणि म्हणून महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले असतील तर तेही सांगावे. महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले त्यातील महत्त्वाचे उद्योगपती म्हणतात यापेक्षा मोठे प्रकल्प आणू… आणा ना कधी आणणार आहात….कुणी अडवले… तरुणांची नोकरीची वये जायला लागली आहेत. ही वस्तुस्थिती सांगणे हे विरोधी पक्षनेते म्हणून माझे काम आहे असेही अजित पवार म्हणाले.

आनंदाचा शिधा आता जनतेला ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. अजून महाराष्ट्रातील लोकांना शिधा मिळालेला नाही. एका तर बहाद्दर मंत्र्यांने सांगितले की, तुलसीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते तोपर्यंत देऊ अजूनपर्यंत दिलेला नाही. ओला दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही. हे महत्वाचे मुद्दे समोर आणत आहे. वेगवेगळी पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देत आहे अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

या वाचाळवीरांना आवरा… त्यांना ताबडतोब सूचना द्या… महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लीप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही परंतु लहानपणापासून ऐकत आलो… धिप्पाड अफजलखान इतिहासात दाखवला जात होता. वाघनखे वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाला मारले त्याचा कोथळा बाहेर काढला परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन (नरसिंहासारखा) कोथळा बाहेर काढताना दाखवले आहे. अरे काय दाखवताय… का मोडतोड करताय इतिहासाची… सेन्सॉर सरकार नेमते.. सरकार हस्तक्षेप करू शकते. जे काही इतिहासात घडले त्याला तोडफोड करून दाखवू नका… छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

दरम्यान याबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांची भेट घेणार का असा प्रश्न केला असता आज उशिरा राज ठाकरे यांच्याशी बोलेन व या चित्रपटाबाबत हस्तक्षेप करायला सांगेन असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट तज्ज्ञ लोकांना घेऊन बघेन आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.