अकोला : मंदिराच्या सभामंडपावर कडुलिंबाचं झाड कोसळलं, सात भाविकांचा मृत्यू

अकोला  –  अकोला जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे कडुलिंबाचं झाड सभामंडपावर कोसळून सात भाविकांचा काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. पारस इथल्या बाबुजी महाराज संस्थानात ही घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी आहे, तर 30 जण जखमी झाले.

संस्थानात दुःख निवारण कार्यक्रमाच्या तयारीसाठी मंदिराच्या बाजूच्या सभामंडपावर भाविक एकत्र जमा झाले होते. वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेलं दीडशे वर्षं जुनं कडुलिंबाचं झाड सभामंडपावर कोसळलं. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दुःख व्यक्त केलं असून, प्रशासन, विद्युत विभाग तसेच महसूल विभाग, आरोग्य विभागाला मदत कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.अकोला दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर.