सगळ्या महाराष्ट्राला माहितीय, मी तंबाखु खात नाही –  शंभूराज देसाई 

मुंबई –  सोशल मीडियावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Excise Minister Shambhuraj Desai) यांनी त्यांचे सहकारी भरत गोगावले यांना विधानसभेत   दिलेली पुडी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरुन, ठाकरे गटानेही मंत्री महोदयांवर निशाणा साधला. याबाबत, आता मंत्री देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मी गेल्या १५ वर्षांपासून सभागृहाचा सदस्य आहे, त्यामुळे सभागृहाचे नियम मला माहिती आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहितीय, मी तंबाखु खात नाही, ती मसाला इलायची पुडी होती, असे स्पष्टीकरण राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलं आहे.

आम्ही सरकारची बाजू भक्कमपणाने मांडतो, त्यामुळे कुठले तरी विषय काढून आम्हाला बदनाम करण्यात येत आहे. मात्र, माझ्या मनाला माहितीय, मला माहिती आहे मी तंबाखुच खात नाही. तर, भरत गोगावले हेही तंबाखु खात नाहीत, असेही देसाई यांनी म्हटले. यावेळी, देसाईंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोलाही लगावला.