‘म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का’, अनिल गोटे संतापले

मुंबई : महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

या आरोपांवर आता माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असं त्यांनी (फडणवीसांनी) म्हटलंय. माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं. तर फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचं म्हटलय. ‘म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का’ असा सवालही उपस्थित केला आहे.

रेकॉर्डिग केल्याच्या बाबीवरुनही अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेले फोन टॅपिंगचा आरोपांचा हवाला देत अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीस यांनी तो फोन अनिल गोटेंना करण्यात आला असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अनिल गोटे यांनी सर्व आरोप फेटाळू लावले आहेत. तसंच खासगीत आता आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही? असाही सवालही उपस्थित केला आहे.