‘आता मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील?, की फक्त मन की बात मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?’

मुंबई : युक्रेन-रशियाच्या युद्धात युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे या विद्यार्थ्यांचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी होता. यामुळे खळबळ माजली आहे. अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे.

युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आता या बातमीने खळबळ माजली आहे.

यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवरून नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ? की फक्त मन की बात मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?’ असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.