मुख्यमंत्र्यांचा साधेपणा पाहून मानाचे वारकरी असलेले नवले दाम्पत्य देखील भारावले

पंढरपूर – आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजाबाई नवले (Warkari Shri. Murali Navale and his wife Mrs. Jijabai Navale) या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.

पांडुरंगाच्या शासकीय पूजेनंतर बळीराजाचे रूप असलेल्या मानाच्या वारकरी जोडप्याचा सन्मान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक पूजा संपन्न झाल्यावर आपला बडेजाव बाजूला ठेवून या मानाच्या वारकरी जोडप्याचे पाय धरले. बळीराजाच्या रुपात भेटलेल्या ह्या विठोबा आणि रखुमाईचे (Vithoba and Rakhumai) पाय धरून त्यांनी त्यांचे मनापासून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून नवले दाम्पत्य देखील क्षणभर स्तब्ध झाले.

यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते या नवले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठू रखुमाईची सुरेख मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. तसेच एसटीच्या वतीने विनामूल्य प्रवासासाठी एक विशेष पासही देण्यात आला. मात्र आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी दाखवलेला हा साधेपणा उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेला.