भडकाऊ भाषण देऊन महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी…; मिटकरींचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

 मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर काल झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. राज्यात सुरु असलेलं गलिच्छ राजकारण,  मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, राष्ट्रवादीचा जातीयवाद, समान नागरी कायदा, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रत्यके नेत्याचा शेलक्या शब्दात ठाकरी शैलीत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. आपल्या भाषणातून ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा अक्षरशः बुरखा फाडला.

दरम्यान, काल झालेल्या राज ठाकरेंच्या एका सभेमुळे संपूर्ण महाविकास आघाडी एकट्या राज ठाकरेंवर तुटून पडली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी राज यांना खोचक टोला लगावला आहे. सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न… वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. जाहिर सभा …उत्तर सभा आता वाट पुरवणी सभेची सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न… वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच  शिव शाहू फुले आंबेडकरांची चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या असंही म्हटलं आहे.

भडकाऊ भाषण देऊन महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शिव शाहू फुले आंबेडकरांची चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध फुले-शाहू-आंबेडकर अशी वेगळी मांडणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राने हाणून पाडलाय #विझलेला दिवा असं देखील मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.