जातीयवादी राष्ट्रवादी ? : कन्यादान विधीची अमोल मिटकरींनी उडवली खिल्ली; मुंडे -पाटलांना हसू आवरेना

सांगली – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना  पुरोहितांच्या मंत्रोच्चाराची खिल्ली उडवली आहे.

विशेष म्हणजे एका समाजाची खिल्ली उडवली जात असताना  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री  जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) स्टेजवर उपस्थित होते. पुरोहित वर्ग विविध कार्यांमध्ये मंत्र उच्चारण करतो त्याची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली.  हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारूनसुद्धा त्यांनी खिल्ली उडवली, त्यावेळी  जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. पाटील- मुंडे या जेष्ठ नेत्यांनी त्यांना अजिबात रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ते सुद्धा हसत हसत त्यांना दाद देताना दिसून आले.

पुढे बोलताना ते म्हणाले,  आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती. यावेळी ब्राह्मणाने एक मंत्र म्हटला ज्याचा अर्थ मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितला की, महाराज म्हणताय माझी पत्नी घेऊन जा. असं मिटकरी म्हणाले. दरम्यान, यामुळे राज्यभरात पुरोहित संघटना संतप्त झाल्या असून आमदार अमोल मिटकरींवर टीका करत आहेत.

दरम्यान, असा कोणताही मंत्र कन्यादान सोहळ्यात वापरला जात नाही असं सांगण्यात येत आहे. पुढे मिटकरी यांनी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या कन्यादान (kanyadan)  या शब्दाची आणि विधीची देखील खिल्ली उडवली त्यावेळी सुद्धा मुंडे आणि पाटील हसत होते असं दिसतंय.  एखाद्या विशिष्ट व्यवसायाविषयी, एखाद्या विशिष्ट समाजाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रव्यापी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या पद्धतीने वर्तणूक करावी याविषयी सोशल मीडियातून प्रचंड नाराजी देखील व्यक्त होत आहे.