गायिका अमृता फडणवीस यांची राजकारणात होणार एन्ट्री, स्वत: दिलेत संकेत

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. सध्या ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंंत्रीपदी कार्यरत आहेत. आता त्यांच्यामागोमाग त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राजकारणात उतरणार असल्याचे संकेत आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना स्वत: अमृता फडणवीस यांनी याबद्दल सांगितले आहे. जेव्हा राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकेन, तेव्हा राजकारणात येईन, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या सातत्याने राजकीय विषयांवर आपली परखड मतं मांडत असतात. सध्या त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नाही. मात्र त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत (Amruta Fadanvis To Join Politics) दिल्यानंतर सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत.

राजकारण हे पूर्णवेळ देऊन कार्य करण्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी राजकारणाला पूर्ण वेळ देऊ शकेन, तेव्हाच राजकारणात येईन, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. सध्या काम, समाजसेवा, मुलीला वेळ देणे, गायन यामुळे बरचसं व्यग्र राहावं लागतं. त्यामुळे जेव्हा आपण राजकारणाला पूर्ण वेळ देऊ असं वाटेन, तेव्हाच आपण राजकारणात येऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं.

अमृता फडणवीस या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ट्विटरच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करत असतात. शिवाय विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यासाठीही त्या परिचित आहेत. त्या ऍक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसंच त्या गायिका आणि अभिनेत्री आहेत.