मणिपूरच्या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे – अण्णा हजारे

मुंबई : मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्याच्या बातम्या समाज माध्यमांवर (Manipur Violence) व्हायरल झाले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. यातच आता मणिपूरची घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी म्हटले आहे.

मणिपूरचे घटना निंदनीय आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रिला मातेचा मान आहे. त्यामुळे मातेची अशी विवस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. विशेष म्हणजे या घटनेवर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे. असे ते म्हणाले.

यावरून कायदा व सुव्यवस्था बिघड्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही. यावर आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहोत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले.मणिपूरच्या घटनेतील एका महिलेचे पती सैनिक होते. जो सैनिक आपल्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे, त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणे योग्य नाही. आमच्यातील मानवतेवर हा मोठा कलंक आहे. एक स्त्री आमची बहीण- आई आहे, तिच्यावर असा अत्याचार होणे हे गंभीर आहे, याकडे आपण नक्कीच केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असेही हजारे म्हणाले.