‘पूर्वी सरकारी बँकांना बुडित कर्जांमुळं हजारो कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा पूर्वी व्हायची,मात्र आता…’

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल झालेल्या रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती होणाऱ्या सुमारे 70 हजार नवीन उमेदवारांना दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्रं वितरित केली. पंतप्रधानांनी या युवकांना संबोधित करताना जनहितासाठी जबाबदारीनं काम करण्याचा सल्ला दिला. देशभरात 44 ठिकाणी या रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बोलताना, गेल्या नऊ वर्षांत जगातील 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत झेप घेतल्यानं आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा उदय झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणं भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनणार आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

बँकिंग क्षेत्राबद्दल बोलताना मोदी म्हणाले, आज भारतात हे क्षेत्र सर्वात मजबूत मानलं जातं, मात्र नऊ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सरकारी बँकांना बुडित कर्जांमुळं हजारो कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा पूर्वी व्हायची, तर आज विक्रमी नफ्यासाठी चर्चा होत आहे. सरकारनं 2014 पासून देशातील सरकारी बँकांचं व्यवस्थापन मजबूत केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रामध्ये, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल पुण्यात यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं दिली. देशात मोठया प्रमाणात प्रशिक्षित युवकांना जशी रोजगाराची आवश्यकता आहे तशीच विविध कंपन्यांनाही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य वाढवून या संधीचा फायदा घ्यावा, असं त्या म्हणाल्या. पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात एकंदर 190 जणांना नियुक्ती पत्रं देण्यात आली.