लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार

Anna Hazare :- लोकायुक्त विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्याना ही बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

युपीए 2 सरकारच्या कार्यकाळात देशभरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एकामागून एक समोर यायला लागल्याने त्याना आळा घालण्यासाठी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची मागणी पुढे आली. हे विधेयक संसदेत मांडून ते पारित करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आमरण उपोषण केले. अण्णांचे आंदोलन अल्पावधीतच लोकांनी उचलून धरल्याने त्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. अखेर जनतेच्या रेट्यामुळे 2014 साली युपीए -2 सरकार कोसळले. केंद्रात लोकपाल प्रमाणेच राज्यातही लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यावेळी अण्णांनी केली होती. त्यांचे हे स्वप्न आज पूर्ण करून गेल्या अधिवेशनात हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. त्यानंतर आज हे विधेयक विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देखील या विधेयकाद्वारे लोकयुक्तांच्या कक्षेत आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही बातमी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फोन करून सांगितली. यावेळी त्यांनी सध्या राज्यात अनेक आंदोलने सुरू असून तुमचे आंदोलन आम्हाला परवडले नसते त्यामुळे आम्ही लोकयुक्त विधेयक मंजूर केल्याचे सांगितले. यावर अण्णांनी समाधान व्यक्त करत तुमच्या कारकिर्दीत हे विधेयक तुम्ही संमत करून घेतलेत याचा विशेष आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल असेही त्यांनी सांगितले. काही जणांचा हे विधेयक मांडण्याला विरोध होता मात्र अण्णा जे काही सांगतील सुचवतील ते सर्वसामान्य लोकांच्या भल्याचेच असेल याची खात्री पटल्याने या विधेयकाच्या मार्गातील सगळे अडथळे बाजूला करून ते संमत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अण्णांना सांगितले. तसेच राज्यातील महायुती सरकारला यापुढे देखील आपल्या मार्गदर्शनाची गरज असून त्यासाठी तेब्येतीची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा हजारे यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून फोन करून संवाद साधल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही