महायुतीत धुसफूस : कवाडे गटाला महायुतीमध्ये घेतल्याने आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष नाराज

मुंबई – भाजप शिवसेनेची युती होती रिपब्लिकन पक्ष त्यात सामील झाल्यापासून युतीची महायुती झाली आहे.शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची हिम्मत कोणीही रिपब्लिकन नेता दाखवीत नसताना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचंड राजकीय रिस्क घेऊन शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती यशस्वी करून दाखविली. भाजप ला आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थन करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला विश्वासात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade of People’s Republican Party) याना महाविकास आघाडीतुन महायुती मध्ये घेतले आहे. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ज्यांनी महाविकास आघाडीत राहून महायुती वर टीकास्त्र सोडले आणि भीमशक्ती शिवशक्तीभाजपवर आसूड ओढण्याचे काम केले. भाजपला साथ देता म्हणून रिपब्लिकन पक्षावर जे टीकेचा आसूड ओढत होते त्यांना सोबत घेताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात का घेतले नाही.कवाडे गटावर विश्वास ठेवताना रिपब्लिकन पक्षाने महायुतीला विश्वासाने दिलेले योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना का आठवले नाही असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी आज केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये कुणाला प्रवेश द्यावा किंवा त्यांच्या पक्षाने कुणाशी युती करावी हा त्यांचा अधिकार आहे.मात्र महायुती मध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) हे तीन पक्ष घटक पक्ष आहेत. या पक्षांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन नवीन पक्षाला महायुती चा घटक पक्ष करणे आवश्यक आहे.मात्र याबाबत कोणतेही मित्रपक्षाचे संकेत न पाळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पी आर पी ला महायुती मध्ये घेण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा आहे. महायुती मधील विश्वासार्हता अभेद्य राहील याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पाहिजे असे मत रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी व्यक्त केले.

महायुती मधील जोगेंद्र कवाडे यांच्या पी आर पी च्या प्रवेशाबाबत रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार आहे अशी माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली आहे.